गोंदिया - एका व्यक्तीची फार्म हाऊसवर गोळ्या झाडून हत्या झाल्याचे समोर आले आहे. सुरेश यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून ८ महिन्याआधी मृताच्या मुलाने गोंदिया शहरात २० वर्षीय तरुणाची हत्या केली होती. या हत्येच्या बदल्याच्या भावनेतून अज्ञात आरोपीने हत्या केली का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
गोंदिया शहरात आज रात्री ८ च्या दरम्यान ५५ वर्षीय सुरेश यादव यांची गोंदिया शहराच्या मुर्री भागात एफसीआय गोडाऊन जवळ असलेल्या फार्म हाऊसमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे २८ मे २०१९ ला मृत सुरेश यादव यांच्या मुलाने गोंदीया शहरातील २० वर्षीय मुर्ली शर्मा यांची क्षुल्लक कारणावरून हत्या केली होती. मृताचा मुलगा गोलू यादव आणि त्याचे इतर तीन सहकारी जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असली तरीही बदल्याच्या भावनेतूनच सुरेश यादव याची हत्या करण्यात आली का या दिशेने पोलीस तपास करत आहेत.