गोंदिया - ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर वेतनवाढ झाले आहे. मात्र, असे असताना फक्त गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ झाले नाही. यासाठी कंत्राटी अभियंता, कर्मचारी यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांना वेतनवाढ देण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतेही ठोस प्रत्युत्तर न मिळाल्याने आज (सोमवार) विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना, कंत्राटी अभियंता आणि कर्मचारी यांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडली. तसेच मानधन वाढ करावी, अशी मागणी केली.
कमी पगार आणि मानधनात काम करणाऱ्या या कर्मचारी वर्गावर सध्या मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांना त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा गोंदिया जिल्ह्यातील रोजगार हमी कामावर मोजमाप करणार नाही आणि कामबंद आंदोलन करू, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा... धक्कादायक..! मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने भाचीवर बलात्कार, पीडिता गर्भवती
ग्रामीण भागातील मजुरांना रोजगारासाठी स्तलांतर करावे लागू नये. तसेच गावातील मजुरांच्या हाताला गावातच काम मिळावे, या उद्येशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा देशात 2015-16 मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. त्याचप्रमाणे मागील काही वर्षांपासून राज्यातही तो अग्रेसर आहे. यावर्षी देखील या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 97 हजार 825 मजुरांच्या हाताला काम देण्यात आले. यात 143 कंत्राटी कर्मचारी 11 महिन्याच्या कंत्राटावर कार्यरत असतात. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल स्थानी पोहोचला आहे.