गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली या गावात २ दिवसीय पाचव्या बिऱ्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा रविवारी समारोप करण्यात आला. या परिषदेत इतर लोकांप्रमाणे भटक्या लोकांच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा असा ठराव पारित करण्यात आला आणि ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले.
शोषित, पीडित, भटक्या-विमुक्त समाजाच्या उत्पन्नासाठी कार्य करणाऱ्या भटके-विमुक्त विकास परिषद विदर्भ प्रांताच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण देशात १६ कोटी ७० लाखाच्यावर भटक्या जमातीची संख्या आहे. तर राज्यात २ कोटींच्यावर भटकी जमात वास्तव्यात आहे. या भटक्या जमातीला समाजाच्या मुख्य प्रवाहात जागा देण्यात यावी, भटके लोक ज्या गावात राहतात त्याठिकाणी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करून द्यावे तसेच वसाहतीत देखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावे, अशी मागणी भटक्या जमातीच्या लोकांनी शासनाकडे केली.