गोंदिया - वाढते अपघात आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसावा यासाठी गोेंदिया वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेअंतर्गत २५० वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाभरातील सर्व ठाणेदार, जिल्हा वाहतूक शाळा प्रभारी अधिकारी, पोलीस नियंत्रण कक्ष यांना या मोहीमेसंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. जिल्ह्यात वाढत असलेल्या अपघाताच्या प्रमाणात आळा घालण्यासाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता जिल्ह्यात पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांनी सर्व पोलीस ठाण्यांना पत्र देऊन २६ एप्रिलला विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेशही दिले होते. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
सर्व पोलीस ठाण्यांनी या मोहिमेत सहभागी होत थेट कारवाईही केली. गोंदिया शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर व अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी आज सकाळपासूनच या विशेष मोहिमेदरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने, ट्रिपल सीट दुचाकी, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांविरोधात चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.