गोंदिया - हातात चांगली नोकरी असताना देखील, नोकरी सोडून भालचंद्र ठाकूर यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला आपल्या मालकीच्या 20 एकर शेतात अत्याधुनिक पद्धतीने शेती केली. त्यांना त्यात यश येत गेले, आज तब्बल 700 एकरात त्यांनी विविध फळांच्या बागा फूलवल्या आहेत. ठाकूर यांनी आपल्या शेतात तब्बल 125 प्रकारच्या फळांच्या प्रजातींची लागवड केली आहे. त्यांची ही यशोगाथा खास 'इटीव्ही भारत'च्या वाचकांसाठी
भालचंद्र ठाकून यांचे वडील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात संशोधक होते. त्यामुळे ठाकूर यांना देखील शेतीची आवड निर्माण झाली. भालचंद्र ठाकूर हे उच्चशिक्षित असून, ते नोकरीत चांगल्या पदावर काम करत होते. मात्र शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 एकर शेतात आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. त्यांनी यासाठी शेतकरी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा केली. तसेच विदेशात जावून नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. यातून त्यांनी आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. 20 एकर शेतीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 700 एकर शेतीवर जाऊन पोहोचला आहे. या माध्यमातून त्यानी शेकडो तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
उत्पादनाची विदेशात निर्यात
भालचंद्र ठाकूर यांनी ठीबक सिंचन, शेडनेट, पॉलिहाऊस, शेततळे अशा आधुनिक पद्धतीचा वापर करून त्यांनी शेतात नंदनवन तयार केले आहे. त्यांनी वदर्भातील पारंपरिक शेतीला फाटा देत फळ शेती करण्याचा निर्यण घेतला. त्यांनी ड्रॅगन, पमोली, लिची, पेरू, बोराचे उत्पादन घेतले. त्यांच्या उत्पादनाला भारतासह थेट चीन, दुबईच्या बाजार पेठेतून देखील मागणी आहे. त्यांच्या मुलाचे शिक्षण विदेशात झाले आहे, मात्र तो देखील नोकरी न करता आपल्या वडिलांना शेतीत मदत करतो आहे.