गोंदिया - रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाखालून अंडरग्राऊंड वायर टाकत असताना मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, रेल्वे रुळाखालून अंडरग्राऊंड वायर टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तेथे खड्डा खोदून खड्यात काम सुरू असताना बाजूच्या रुळांवरून रेल्वे गाडी गेल्याने कंपन होऊन तीन मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा आणि रेल्वेचे साहित्य कोसळले. या दुर्घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला.
संबंधित काम गोंदियातील भगवती कन्ट्रक्शन कंपनीचे असून हे मजूर या कंपनीत कंत्राटी तत्वावर काम करत होते. योग्य खबरदारी न घेतल्याने आज दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागला असून त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. राजेश शरणागत (वय ३५), अंकर पंधराम (वय ४०) यांचा या घटनेत मृत्यू झाला. तर चंद्रविलास शहरे (वय २५) हा जखमी झाला. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.