गोंदिया - आमगाव ते देवरीदरम्यान तयार होत असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अवैध मुरूमाचा वापर केला जात आहे. या अवैध गौण खनिजामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत असल्याची तक्रार कारूटोला ग्रामपंचायतीने सालेकसा तहसीलदारांकडे केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी मार्गाचे मागील दीड वर्षापासून चौपदरीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याचे बांधकाम पुण्यातील एम. बी. कंस्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात येत आहे. मात्र कंस्ट्रक्शन कंपनी आपल्या मर्जीने वाटेल त्या ठिकाणचे खोदकाम करून मुरूम रस्त्याच्या ठिकाणी टाकत आहे. सालेकसा तालुक्यातील कारूटोला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्र. 403 हा गट शाळेच्या जवळ असल्यामुळे या गटाची ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारची खोदकामाची परवानगी दिली नाही. तरीही एम. बी. कंस्ट्रक्शन कंपनीने या गटात मोठ्या प्रमाणात खोदकाम करून बळजबरीने जवळपास दोन महिन्यांत 2 हजार ब्रासच्यावर मुरूम खोदकाम करून अवैध गौण खनिजाची वाहतूक करण्यात आली आहे. याची किंमत जवळपास 3 कोटीच्या वर असून शासनाचा महसूल बुडत आहे.
कुठल्याही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खनन करण्यापूर्वी ग्रामपंचायतची परवानगी व महसूल विभागाकडूनही परवानगी घ्यावी लागते. परंतु या ठिकाणचे खनन करताना कुणाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही. जेसीबीने मुरूमाचे खनन करून शासनाला लाखो रूपयांचा चुना लावला जात आहे. यासंदर्भात तहसीलदारांकडे कारूटोलाच्या सरपंच रायाताई फुन्ने, उपसरपंच नंदकिशोर चुटे, सदस्य संतोष बोहरे, संजू बागडे व इतर सदस्यांनी तक्रार केली आहे.
सालेकसाच्या तहसीलदारांना सरपंचाच्या स्वाक्षरीने लेखी तक्रार करण्यात आली. परंतु तहसीलदारांनी अजून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या कंपनीसोबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच अवैध मुरूम वाहतूक केल्याने ग्रामपंचायत समोरील डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर ग्रामपंचायतीच्या दोन बोअरवेल दबून खराब झालेल्या आहेत. त्यामुळे या गावात पाण्यासाठी महिलांची पायपीट होत आहे. तरी एन. बी. कन्स्ट्रक्शन कंपनीने त्वरित हा डांबरी रस्ता व बोरवेल दुरूस्ती करून देण्यात यावा, अन्यथा रास्ता बंद करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी दिला आहे.