गोंदिया - राज्यातील शेतकरी दुष्कळाने होरपळत आहे. अशातच जिल्ह्यातील 20 दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज न घेताच बोजा चढवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्यात हा आकडा 109 वर गेला आहे. अपंग विकास महामंडळाच्या या प्रतापामुळे केवळ अर्ज केला म्हणून कर्जदार ठरविण्यात आलेल्या या शेतकऱ्यांना दुसरीकडे कर्ज मिळणे अवघड झाले आहे.
गोंदिया जिल्हातील दिव्यांग शेतकरी कैलास कोसरकर हे अपंग आहेत. अल्पभूधारक शेतकरी असूनसुद्धा जोडधंदा करावा, या उद्देशाने 2017 साली कुक्कुटपालनासाठी 20 हजार रुपये कर्ज घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी गोंदिया अपंग विकास महामंडळाकडे अर्ज केला. आवश्यक ती कागदोपत्री सर्व पूर्तता करून प्लॉटही गहाण ठेवला. मात्र आजपावतो त्यांना निधी नसल्याने कर्ज मिळाले नाही. मात्र अपंग विकास महामंडळाने त्यांच्या गहाण प्लॉटवर कर्जाचा बोजा चढविला आहे. आता केवळ अर्ज केल्यावर कर्जदार म्हणून त्यांची गणना केली जात आहे. त्यामुळे कर्ज असल्याने आता शेतीसाठी त्यांना पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे आता कर्ज देत नसाल, तर दिलेले कागद व चेक वापस करण्याची मागणी या अपंग शेतकऱ्याने केली आहे.
मंत्री मंडळाचे खांदेपालट होण्यापूर्वी गोंदियाचे पालकमंत्री व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अखत्यारित हा विभाग येत होता. 2017 पासून हा प्रश्न त्यांना मार्गी लावता आला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या विदर्भात आता केवळ अर्ज केला म्हणून कर्जदार झालेल्या शेतकऱ्यांनीही आत्महत्या करण्यास सुरुवात केली, तर त्याला जबाबदार कोण, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला.