गोंदिया - भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासुन गैरश्रमिक २०० नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गोंदिया रेल्वे स्टेशन मुबंई-हावडा मार्गावर असल्याने महत्वाचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेच्या पत्रानुसार गोंदिया जिल्ह्यातून तीन रेल्वे गाड्या तिरोडा, गोंदिया, आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याचे व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले गेले आहे.
जनशताब्दी एक्सप्रेस क्रमांक ०२०६९ रायगड ही आज दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहोचली. या ट्रेनमधून ६६ प्रवाशी गोंदिया स्टेशनवर उतरले. या प्रवाशांची थर्मल स्क्रिीनिंग करून त्यांना प्लॅटफार्म बाहेर सोडण्यात आले. तर या ट्रेनमध्ये गोंदियातून ११५ प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झाले. या सर्व प्रवाशांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत थर्मल स्क्रिनिंग करून प्लॅटफार्मवर प्रवेश देण्यात आला. त्याचप्रमाणे सोशल डिस्टंन्स ठेऊन रेल्वेत बसविण्यात आले. ही गाडी गोंदिया येथून रोज नियमित वेळेवर सुटून राजनांदगाव, डोंगरगड, तिलदा, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, अकजतरा, नाईला, जांजगीर, चांपा, बारडवार, शक्ती, खरसिया या स्टेशनवर थांबा घेऊन रायगडला पोहोचणार आहे.