गोंदिया - हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून त्यामध्ये मदत करण्याकरिता पोलीस हवालदारामार्फत लाच रकमेची मागणी करणार्या गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला ही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे. रामसिंह सूरजसिंह बैस असे हवालदाराचे तर रंगनाथ त्र्यंबक धारबळे असे लाचखोर पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षकानेच हवालदाराला लाच घेण्याकरिता केले प्रोत्साहित -
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार माजी सैनिक उत्तमचंद मोहन खांडेकर (५० वर्ष रा. तांडा, जि. गोंदिया) यांच्या विरुद्ध हद्दपारीचा आदेश पारित करण्यात आला होता. मात्र, केवळ कागदोपत्री आदेशाची अंमलबजावणी दाखवून तक्रारदारास हद्दपार असतानाही गोंदियामध्ये येण्याजाण्यासाठी पोलीस मदत करायला तयार होते. त्यासाठी त्यांनी हद्दपार असलेल्या खांडेकर यांच्याकडून १५ हजाराची मागणी केली. यामध्ये पोलीस निरीक्षक धारबळे यांनीच हवालदार बैस यांना ही लाच स्वीकारण्यास प्रोत्साहित केले होते. यामध्ये हवालदारास ५ हजार आणि निरीक्षकास १० हजार अशी वाटणी ठरली होती.
या प्रकरणातील हद्दपार खांडेकर यांनी मात्र, लाच देण्यास इच्छूक नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची तपासणी करून लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत आरोपी पोलीस हवालदार रामसिंह बैस याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
धारबळे याच्याकडे काही दिवसापूर्वीच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पदभार सोपवण्यात आला होता. मात्र आरोपी रामसिंह सूरजनाथसिंह बैस याला लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे तथा मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात कलम १२ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) वाढ करून आरोपी पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे यालाही अटक करण्यात आली.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार व मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, नाईक पोलीस शिपाई रंजीतकुमार बिसेन, दिगंबर जाधव, नितिन रहांगडाले, राजेंद्र बिसेन आदींनी केली.