गोंदिया - गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत नव्याने रूजू झालेल्या पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तयार केले आहे. काही दिवसांत या पथकाने २० दुचाकींसह ८ आरोपींना अटक केली आहे.
तालुक्यातील गंगाझरी गाव परिसरातील काही संशयित व्यक्ती गोंदिया शहरामध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे करत असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली. बातमीच्या अनुषंगाने अधिक माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगाझरी, मजितपूर परिसरातून काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने विचारपूस केली असता प्राथमिक चौकशीमध्ये दुचाकींची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांना अटक करून अधिक विचारपूस केली असता, त्यांनी गोंदिया जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या मोटरसायकल चोरीमध्ये गंगाझरी, मर्जीतपूर येथील शिवम संतोष खरोले (वय १९), शुभम रमेश पटले (वय २०), सलाम रफीक शेख (वय २०), राहुल रविंद्र मस्करे (वय २०), राकेश रामदास मडावी (वय २७), प्रविण उर्फ छोटु गणेश बिसेन (वय २५), जितेंद्र सेवकराम साकोरे (वय २२), गणेश प्रल्हाद मेश्राम (वय २०) यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.