गोंदिया : पुरी-अजमेर एक्स्प्रेस (18421) मध्ये अवैधरित्या गांजा वाहून नेणाऱ्या पती-पत्नीला रेल्वे सुरक्षा दलाच्या टास्क टीमने ताब्यात घेतले आहे. मलखान शंभू प्रजापती (वय 39) व शिवानी मलाखान प्रजापती (वय 30 रा. खुरई, मौलाना अब्दुल कलाम वॉर्ड, जिल्हा सागर, मध्यप्रदेश) असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.
हेही वाचा- ट्रकचालक खून प्रकरणातील सहा आरोपींना पुण्यातून अटक, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त..
रेल्वे सुरक्षा दलाची टास्क टीम पुरी-अजमेर एक्स्प्रेसमध्ये दुर्ग ते गोंदियापर्यंत गस्त घालत होती. दरम्यान, गाडी गोंदियाला पोहचण्यापूर्वी बोगी एस-4 मधून एस-5 मध्ये एक पुरूष व महिला वारंवार सामानांची अदलाबदली करताना संशयास्पदरित्या आढळले. त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांचाजवळ मसाला साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे गाडी गोंदियाला पोहचली असता गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाला बोलावून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे 9 पॅकेट गांजा आढळून आला. या 9 पॅकेटचे एकूण वजन 16 किलो 184 ग्रॅम असून त्याची बाजारात 1 लाख 61 हजार 840 रूपये किंमत आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.