गोंदिया - बंदुक व चाकुचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्या 4 आरोपींना देवरी पोलिसांनी अटक केली. हे सर्व आरोपी 21 ते 25 वयोगटातील आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीत आशिष युगलकर शर्मा (वय, 22), आकाश युगलकुमार शर्मा (वय, 21) सचिन हेमराज मेश्राम (वय, 25) व सौरभ बाळक्रुष्ण गायधने (वय, २०) यांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथील शेतकऱ्याच्या शेतात बोअर करण्यासाठी मुरुय्यसन अम्मावासई व त्यांचे नौकर गेले होते. हे काम पूर्ण करून रात्री परत येत असताना आरोपींनी शिलापूर गावानजवळ त्यांना थांबवून बंंदुकीचा व चाकुचा धाक दाखवला. तसेच त्यांच्याकडून 2 हजार रुपये लुटुन आरोपी पसार झाले. सदर घटनेची व्हिडीओ गाडीत असलेल्या सीसीटीवी कॅमेरात कैद झाला. याप्रकरणी गाडी मालक मुरुय्यसन अम्मावासई यांनी देवरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा नोंद करत सदर आरोपीला देवरी पोलिसांनी अटक केली आहे.