गोंदिया - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ एप्रिलला मोदींची सभा गोंदिया येथील बालाघाट रोड 'टी पॉईंट' येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला राज्यात पहिल्या टप्यात मतदान होणार आहे.
येत्या ११ एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका होणार असून, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्षांनी प्रचारला सुरूवात केली आहे. आपला उमेदवार या निवडणुकीत निवडून आला पाहिजे, यासाठी अनेक पक्षांकडून स्टार प्रचारक प्रचाराला येणार आहेत. भंडारा-गोंदियामध्ये दिग्गज नेत्यांना व स्टार प्रचारकांना सभेला आणून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा सर्वच पक्षांचा मानस आहे.
भारतीय जनता पक्षाने ३ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा गोंदिया येथे आयोजित केली आहे. या अगोदर नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला गोंदियाला आले होते. त्यामुळे गोंदियातील ४ विधानसभा मतदारसंघातून भाजपला ३ ठिकाणी यश मिळवण्यात यश आले होते.