गोंदिया- सालेकसा तालुक्यातील दागोटोला जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत सहाय्यक शिक्षिकेची बदली रद्द करण्यात यावे, यासाठी दागोटोलाचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. शिक्षिकेची बदली रद्द न झाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आदिवासी बहुल नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील दागोटोला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चार वर्ग भरतात. विद्यार्थी संख्या 16 आणि चार वर्गांना शिक्षक फक्त एक अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याने येथील पालकांनी टोकाची भूमिका घेतली आहे. या शाळेतील एका शिक्षिकेची बदली इतर शाळेत करण्यात आली. त्या शिक्षिकेला एक तर शाळेत परत नियुक्ती द्या किंवा आमच्या पाल्यांचे दाखले द्या, अशी मागणी पालकांनी केली आहे.
जोपर्यंत शिक्षिकेची बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पाल्यांना शाळेत पाठवणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे. पालकांनी दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. मात्र, विद्यार्थी आणि पालक आपल्या मागणीला घेऊन ठाम असल्याने दागोटोला येथील शाळेत मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट बंद आहे.