गोंदिया - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लॉकडाऊनही जाहीर झाले आहे. सर्व ठिकाणची कामेही बंद असल्याने परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात पायीच गावाकडे निघत होते. ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने या मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरू केली. मात्र, अशाच एका ट्रेनमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने मजुरांना चक्क पाण्याची चोरी करावी लागली.
१९ मे रोजी दुपारी हैदराबाद येथून आलेली ट्रेन काही वेळासाठी गोंदिया स्टेशनवर थांबली. मात्र, गोंदिया रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नव्हती. अशात शेकडो मजूरांनी रेल्वेतून उतरून रेल्वे स्थानकावरील खासगी व्यापाऱ्यांच्या मिनरल वॉटरच्या बाटल्या चोरल्या. मजुरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.