गोंदिया - जिल्हा सामान्य रूग्णालय, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली गेल्यानंतर महाविद्यालयातील समस्या चव्हाट्यावर आल्या आहेत. येथील उपचारापासुन सोयीसुविधांपर्यंत रूग्णांची होणारी फरफट ही कायम आहे. मागील वर्षभरापासुन अतिदक्षता कक्षातील लाईफ सपोर्ट सिस्टम, डायलिसिस मशिन, रक्त तपासणी मशिन तसेच इतर आवश्यक साहित्य बंद आहे. आता तर रूग्णांना मुदतबाह्य औषधांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
हा सर्व प्रकार नगरसेवक लोकेश यादव यांनी समोर आणला आहे. रुग्णांच्या जास्त समस्या येत असल्याने त्यासंबधी यादव यांनी रूग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रूग्णांच्या उपचारासाठी असलेली यंत्रसामग्री बंद स्थितीत आढळून आली. तर रूग्णांना मुदतबाह्य औषधांचा पुरवठा केला जात असल्याचेही समोर आले.
नगरसेवक यादव यांच्या प्रभागातील तरुणाने विष प्राशन केल्यामुळे त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याची विचारपूस करण्यासाठी यादव रुग्णालयात आले त्यावेळी तरुणाला व्हेंटीलेटर होते. तर रूग्णालयातील आयसीयुमध्ये असलेल्या २ पैकी १ व्हेंटीलेटर मागील ५ महिन्यापासून बंद असल्याचे परिचारिकांनी सांगितले. तर औषध भांडारात २०१४ ते २०१८ मध्ये मुदत संपलेले इंजेक्शनही आढळून आले.
महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत क्षय रूग्णांसह इतर रूग्णांसाठी रक्त व कप तपासणीकरता असलेली मशिनसुध्दा मागील १ वर्षापासुन बंद आहे. तर औषधांचा पुरवठा होत नसल्याचे येथील औषध कक्षातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. एकंदरीतच जिल्हा सामान्य रूग्णालयाला वैद्यकिय महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर रूग्णांना उत्तम सुविधा मिळतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, अशा सर्व प्रकारमुळे नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे.