गोंदिया - शहरात गँगवारने पुन्हा डोके वर काढले आहे. गोंदिया शहरात काल रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटातील परस्पर वैमनस्यातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर एक युवक गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. राजा महेश सांडेकर (वय 27 वर्ष रा. सावराटोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर, आशिष ठाकूर (वय 26 वर्ष रा. सावरटोली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - Gondia Crime News : गोंदियात शालेय पोषण आहाराची चोरी, दोघेजण ताब्यात
प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी माहिती दिली की, मरारटोली टी-पॉइंट येथे आरोपी नरेश नागपुरे (35 वर्ष रा. बसंतनगर) व इतर 7-8 तरुणांचा राजा सांडेकर व अन्य 6 तरुणांच्या गटाशी वाद झाला. या नंतर बसंत नगरमध्ये पुन्हा वाद वाढला. या वादातून पुन्हा दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. आरोपी व इतरांनी राजा सांडेकर यांची हत्या केली. या घटनेत आशिष ठाकूर हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे.
पोलीस उपाधीक्षक (गृह) दिनकर ठोसळे, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी सांगितले की, सध्या सर्व आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करून रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी भादंवि कलम ३०२, ३०७, १४३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काल गोंदिया शहरात एकूण तीन हत्येच्या घटना घडल्या.
हेही वाचा - शिवजयंती दिनी पोलिसांची अनोखी भेट; चोरीला गेलेले दागिने फिर्यादीला केले परत