गोंदिया - गुरे चारण्याकरिता गेलेल्या ७० वर्षीय व्यक्तीवर वाघाने हल्या केल्याची घटना घडली. या हल्लात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातंर्गत येत असलेल्या केशोरीपासुन ४ किमी अंतरावरील आंभोरा वन परिक्षेत्र २६४ मध्ये घडली. मृत लक्ष्मण गांढव बोगारे (वय -७०, रा. चिचटोला) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुलाने केली शोधशोध -
मृत लक्ष्मण गांढव बोगारे हे नेहमीप्रमाणे गावाजवळील जंगला जवळ दैनंदिन कामकाजाप्रमाणे गुरे चारण्यासाठी स्वतःच्या घरचे गुरे घेऊन गेला. सायंकाळी गुरे घरी आली. मात्र, ते परत आले नाही. यामळे आपले वडील कुठे राहिले हे तपास करण्यासाठी त्यांचा मुलगा निलकंठ लक्ष्मण बोगारे यांनी गावातील काही सहकाऱ्यांसोबत शोधाशोध केली. रात्री उशिरा ११ वाजेच्या सुमारास लक्ष्मण बोगारे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळुन आले. यावेळी निलकंठ बोगारे यांनी घटनेची माहिती वनविभागाला आणि पोलीस विभागाला दिली. वनविभाग व पोलीस विभागाने आज सकाळी घटना स्थळाला भेट दिली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
वाघाने मागून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती
लक्ष्मण गांढव बोगारे हे जंगलात गेले असता गुरे तलावाच्या दिशेने जात असताना गुरांच्या मागे असणाऱ्या लक्ष्मण बोगारे यांच्यावर दडी धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर मागून हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा - पूजा चव्हाणच्या मृत्यूचा सविस्तर अहवाल पोलिसांच्या हाती
पहिल्यांदाच घडली घटना -
चिचटोला हे गाव गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यच्या सीमेला लागून आहे. या परिसरात या आधी पाळीव प्राण्यांवर अनेकदा वाघाने व बिबट्याने हल्ले केले आहे. मात्र, व्यक्तीवर पहिल्यांदाच हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वनविभागाने या परिसरात गस्ती वाढविण्याचे सांगितले आहे. गावकऱ्यांना एकटे जंगलात जाण्यास मनाई केली आहे. तसेच जंगलात जायचे असल्यास वनविभागाला कळवावे किंवा सोबत एक दोन व्यक्तींना घेऊन जावे, असे निर्देश वन विभागाने दिले आहे.