गोंदिया - तिरोडा येथील गॅस सिलेंडर्स चोरी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 2 खाली व 10 भरलेले असे एकूण 12 सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई 20 मे रोजी करण्यात आली आहे. शुभम उर्फ गोली रतिराम आंबेडारे (वय 23 रा. पागा मोहल्ला, नेहरू वॉर्ड, तिरोडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तिरोडा शहर व ग्रामीण भागात घरगुती गॅस पुरवठा करणार्या एजेन्सी सांकेशा गॅस सर्विसेसचे गोदाम खैरबोडी येथे आहे. भरून आलेले सिलेंडर व रिकामे झालेले सिलेंडर येथे ठेवले जातात. या गोदामातील 33 भरलेले व 97 खाली झालेले घरगुती गॅस सिलेंडर चोरी झाल्याची तक्रार तिरोडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. एकूण 2 लाख 17 हजार 474 रुपये किंमतीचा माल चोरून अज्ञात चोर पसार झाले, असे तक्रारीत नमूद होते. या तक्रारीवरुन पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
अशी केली आरोपीला अटक
एक संशयित व्यक्ती गॅस सिलेंडर विक्री करण्याच्या व काही गॅस सिलेंडर्स लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तिरोड्याच्या नेहरू वॉर्डातील पागा मोहल्ल्यात धाड टाकली. आपल्या घराजवळच आरोपी शुभम आंबेडारे गॅस सिलेंडर्स विक्री करण्याच्या व काही लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता खैरबोडी येथील सांकेशा गॅस सर्विसेस गोदामातून गॅस सिलेंडर्स चोरी केल्याचे त्याने कबूल केले.
आणखी दोन साथीदारांचा शोध सुरु
आरोपी शुभम उर्फ गोली आंबेडारे याची कसून चौकशी केल्यावर त्याने ही चोरी आपल्या इतर दोन साथीदारासह केल्याचे सांगितले. शिवाय गॅस गोदामाचा कुलूप फोडण्यासाठी अवजाराचा उपयोग केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. त्या दोन साथीदारांच्या शोध तिरोडा पोलीस घेत आहे.