गोंदिया- येथील डोंगरगावातील एका नक्षल समर्थकांच्या घरी काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतले. देवरी येथील स्पेशल नक्षल पथक आणि सी-६० च्या पथकाने डोंगरगाव येथील घरी रात्री छापा टाकला. यात मोठ्या प्रमाणात विस्फोटके डिटोनेटर व केबल मिळून आले.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
डोंगरगाव डेपो येथील मडावी नावाच्या व्यक्तीच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून नक्षलवादी स्फोट करण्याकरिता वापरत असलेल्या २१ जिवंत डिटोनेटर आढळले. ऐन निवडणुकीची धुमशान सुरू असतांना इतक्या प्रमाणात डिटोनेटर आणि केबल मिळून आले. मात्र, या नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून काढला. आरोपीस अटक करण्यात आले आहे. आरोपी नक्षल समर्थक हा गोंदिया जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ६ दलापैकी कोणत्या दलातील आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धूमशान सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा क्षेत्रांमधून अर्जुनी मोरगाव व आमगांव-देवरी विधानसभा हे क्षेत्र नक्षल प्रभावित क्षेत्रात मोडतात. यामुळे येथे मतदानाची वेळ पण सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच ठेवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरिता नक्षलप्रभावित क्षेत्रात पोलीस प्रशासनाने प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले आहे.