गोंदिया - कोरोना विषाणूचा फटका यावर्षी सर्वांनाच बसला आहे. याच परिस्थितीत देशासह राज्यात आज (शनिवारी) नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी 512 सार्वजनिक मंडळ दुर्गास्थापना करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 512 पैकी 390 मंडळांनाच काही अटी आणि शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. तर 112 मंडळांना नवरात्रोत्सवापासून वंचित राहावे लागले आहे. तसेच चार फुटीच्या उंचीची दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
शहरातील विविध मंडळांनी दुर्गा देवीच्या मुर्ती दुपारी आपल्या मंडळात नेण्यास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे दर वर्षी गोंदिया 10 फुटांवरच्या उंच मुर्ती तयार करण्याकरिता कोलकाता येथून विशेष मूर्तीकार गोंदियात येऊन मोठ्या मुर्ती बनवायचे. मात्र, यावर्षी शासनाने कमी उंचीच्या मुर्ती बनविण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार दुर्गा मंडळानी स्थानिक मूर्तीकारांकडून मुर्ती बनवून घेतल्या.
गोंदिया येथील दुर्गा देवीची प्रतिमा आणि देखावे बघण्यासाठी राज्यातील, तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, मंडपही यावेळी मोठे नाही. 15 ते 20 लोक येतील, असा मंडप तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मंडपही मोठे तयार करण्यात आलेले नाहीत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे देखावेही यावेळी बनविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे देवीच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांना यावर्षी मंडपाच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.