गोंदिया : २५ जानेवारीच्या रात्री वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा गावच्या नदीत कार कोसळून सात लोकांचा अपघाती मृत्यू झाला ( Wardha Car Accident Seven Death ) होता. हे सातही मृतक सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यलयाच्या मेडिकलचे विद्यार्थी होते. त्यात गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलागा अविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटूंब रहांगडाले कुटूंबियांची भेट घेत सांत्वन ( Nitin Gadkari Met Vijay Rahangadale ) केले. यावेळी आमदार रहांगडाले यांना अश्रू अनावर झाले होते.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
यावेळी गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अपघात कसा झालाय? त्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तांत्रिक कारण, तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना? तसेच ऑटोमोबाईलमुळे तर हा अपघात झाला नाही ना? या सगळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टी बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात मृत्यू पावतात. यावर तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यात 50 टक्के अपघातावर नियंत्रण मिळविले असून, 50 टक्के अपघात मृत्यूवरही नियंत्रण मिळवले आहे. महाराष्ट्रात कशाप्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो, याच्या उपाययोजना करणे गरजचे आहे. वर्धा येथे झालेला अपघात ही घटना खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत. म्हणून आज इथे सहपरिवार त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या मुलांच्या आत्म्याला परमात्मा शांति देवॊ व कुटुबियांना दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशीच प्रार्थना करतो, असे गडकरी म्हणाले.