गोंदिया - भुवनेश्वर-कुर्ला एक्सप्रेसमध्ये बेवारस बॅगमध्ये १५ किलो गांजा आढळून आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने हा १ लाख ५६ हजार ३० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तस्करांनी हा गांजा आणल्याची प्राथमिक माहिती आहे.
सुरक्षा नियंत्रक कक्षाद्वारे भुवनेश्वर-कुर्ला एक्सप्रेसमधील १ क्रमांकाच्या डब्ब्यामध्ये लाल रंगाची बेवारस बॅग असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. संबंधित गाडी गोंदिया रेल्वे स्थानकावर येताच गाडीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी आसन क्रमांक ७३ च्या खाली एक लाल रंगाची बॅग आढळून आली. याबाबत विचारपूस केली असता ही बॅग बेवारस असल्याचे समजले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा पोलीस चौकीत आणून बॅग तपासली असता त्यामधून २ मोठे पिशव्यांमध्ये १५ किलो गांजा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा सर्व गांजा जप्त करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावर तस्करीचे सोने आढळून आले होते.