गोंदिया - तिरोडा वन विभागांतर्गत येत असलेल्या तिरोडा-खैरंलाजी मार्गावर बघोली शेतशिवारात उन्हाळी धान कापणीसाठी शेतकरी तथा सेवानिवृत्त पोलीस पाटील गेले होते. दरम्यान एका रानडुकराने त्यांच्यावर जबर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (24 मे) घडली. धनराज मोहन तुरकर (वय 68 वर्षे), असे मृताचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या उन्हाळी धानपिकाच्या कापणीचे हंगाम सुरू आहे. बघोली येथील माजी पोलीस पाटील हे शेतकरी असल्याने धान पिकाची कापणी सुरू असल्याने गावापासून 2 किलोमिटर अतंरावरील आपल्या शेतात गेले होते. घरी परतताना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही अंतरावर त्या रानडुकराचाही मृत्यू झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तो रानडुकर ज्यास्त वयाचा असल्याने तुरकर यांच्यावर हल्ला केल्याने दोघांमध्ये झुंज झाली व दोघांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्या व दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती माजी सरंपच रमेश पटले यांनी तिरोडा वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून दवनीवाडा पोलीस ठाण्यालाही माहिती देण्यात आली आहे. पोलीसही घटनास्थळी पोहोचून मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मृत धनराज तुरकर यांच्या कुटुंबात एक मुलगा असून आता सर्व जवाबदारी त्याच्यावर आली आहे. वनविभागाने मृत धनराज तुरकर यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - पेट्रोल-डिझेलला पर्याय जैविक इंधनाचा; गोंदियात साकारतोय गवतापासून गॅस निर्मिती प्रकल्प