गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज तीन अंकी आकड्यात रुग्णवाढ होत आहे. हळूहळू जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. मंगळवारी ७४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून एक दिवस चालेल एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.
शासकीय आणि खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध असल्या तरी ऑक्सिजन खाट उपलब्ध नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आज जिल्हात 5362 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यात 105 रुग्ण गंभीर आहेत. तर जिल्हात रेमडीसीमिर इंजेक्शनचा साठा 400 असून हा साठा 2 ते 3 दिवस पुरणार आहे. त्यानंतर रेमडिसीमीर इंजेक्शनचा ही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे बघत जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
कोरोनाचा कहर सुरूच
१३ एप्रिल रोजी तब्बल १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७४२ बाधितांची भर पडली आहे. तर २५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता एकूण बाधितांची संख्या २२,१३९ झाली असून यातील १६,५३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता जिल्ह्यात ५३६२ रुग्ण क्रियाशील आहेत. जिल्ह्यात १३ एप्रिलला ७४२ कोरोनाबाधितांची भर पडली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४३४, तिरोडा ७२, गोरेगाव ११५, आमगाव २६, सालेकसा २०, देवरी २५, सडक अर्जुनी ३५, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील७, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ८ रुग्ण आहेत. तर २५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १६४, तिरोडा ३०, गोरेगाव ५, आमगाव ५, सालेकसा ५, देवरी ९ सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ३०, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या २२,१३९ झाली असून १६,५३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात ४० प्रतिबंधित क्षेत्र
जिल्ह्यात दररोज वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात तब्बल ४० प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. यात शनिवारपर्यंत २३ प्रतिबंधित क्षेत्रे असतानाच रविवारी आणखी ११ प्रतिबंधित क्षेत्रे वाढविण्यात आली. तर मंगळवारी त्यात आणखी ६ प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडली आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात असून त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे अन्य लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यापासून इतरांना धोका उद्भवू नये, यासाठी आता प्रतिबंधित क्षेत्रे तयार केली जात आहेत. शुक्रवारी १ एप्रिल रोजी जिल्ह्यात एकूण २० प्रतिबंधित क्षेत्रे होती. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यात वाढ करून शनिवारी १० एप्रिल रोजी ३, तर रविवारी ११ प्रतिबंधित क्षेत्रे वाढविण्यात आले होते. मात्र बाधितांची संख्या वाढतच चालली असुन, घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्याही वाढत चालली आहे. यामुळे काही परिसरांमध्ये बाधित वाढताना दिसुन येत आहेत. अशात आज आणखी सहा कन्टेंन्मेंट झोन वाढविण्यात आले आहेत. यांनतर आता जिल्ह्यातील एकुण कन्टेंन्मेंट झोनची संख्या ४० झाली आहे.