गोंदिया - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असणार्या मजुरांना उपासमारीची चिंता सतावू लागली. काही मजुरांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. तर अनेक ठिकाणी मजूर अडकून पडले. सध्या आहे त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र, उपासमारीच्या भितीने कामगार आपल्या गावी चालत निघाले आहेत.
तेलंगाणातील हैदराबाद येथे कामासाठी गेलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांनी गर्भवती महिला तसेच लहान मुलाबाळांसह तब्बल ९०० किलोमीटरचे अंतर चालत जाण्याचा निर्धार केलाय. आज ते गोंदियात पोहोचले आहेत. हा प्रवासात हे मजूर कधी पायी, तर कधी ऑटोने, तर कधी पाण्याचे टँकर व ट्रकचा असा आधार घेत जिल्ह्यात पोहोचले. या प्रवासा दरम्यान मजुरांनी सुमारे ६०० किमीचे अंतर पायी कापले आहे. प्रवासात अनेकदा त्यांना खायला अन्न मिळाले नाही. पण घरी परतण्याची तीव्र इच्छा, आप्तस्वकीयांची ओढ यामुळे त्यांनी हा प्रवास सुरू ठेवला. यामध्ये त्यांचे पैसे देखील खर्च झाले आहेत.
मात्र तरीही ६०० किमीचे अंतर कापून ते गोंदियात आले. त्यांना आणखी ३०० किलोमीटरचे अंतर चालून मध्यप्रदेशातील आपल्या गावी जायचे आहे. या प्रवासात त्यांना प्रशासनाची दादागिरी तर कधी सहृदयतेचा अनुभव आला.
सध्या देशातील लाखो मजूर ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर त्यांना स्वत:च्या घराची ओढ लागली आहे. या लोकांना जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे. मात्र, उपासमारीमुळे तसेच गावच्या ओढीमुळे ते जीवाची पर्वा न करता चालत निघाले आहेत.