गोंदिया - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी घोषित झाल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हनुमान मंदिर समिती अशा उपासमार होणाऱ्या नागरिकांसाठी धाऊन आली आहे. त्यामुळे ३ हजार नागरिकांचा भूकेचा प्रश्न मिटला आहे.
शहरातील शीवलाईन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील समिती मार्फत शहराच्या तसेच शहरालगतच्या भागातील जवळपास तीन हजार लोकांना दोन वेळच जेवण मोफत पुरवले जाते. तर ज्या नागरिकांना जेवण पोहोचवणे शक्य नाही, अशा कुटुंबियांना मंदिर समिती तर्फे १ महिना पुरेल अशी फूड किट दिले जात आहे. दरवर्षी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला २० हजाराच्यावर नागरिकांना भोजन दिले जात होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने मंदिर समितीने हे साहित्य संचारबंदीत अडकलेल्या गरजू आणि मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना देण्याचे ठरविले आहे.