गोंदिया - तळ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्ग समृद्ध गोंदियात आता पुन्हा एकदा विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. यामध्ये ग्रेटर फ्लेमिंगो या स्थलांतरीत पक्षांचे देखील तब्बल २० वर्षानंतर आगमन झाल्याचे पाहायला मिळाले. सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील तलाव परिसरात बुधवारी पहिल्यांदाच हे ग्रेटर फ्लेमिंगो आढळून आले आहेत. यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमींमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षी हिवाळ्यात विदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ही पर्यावरण प्रेमी आणि पक्षी मित्रांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. जिल्ह्यातील जैवविविधता कायम राहावी, यासाठी जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी संस्था प्रयत्नरत आहेत. त्यातूनच जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. यामुळे या गोंदियाला सारसांचा जिल्हा अशी एक नवीन ओळख प्राप्त होऊ लागली आहे.
1 जुलै ला 34 ग्रेटर फ्लेमिंगो नागरिकांना पाहायला मिळाले आहेत. ग्रेटर फ्लेमिंगोचे (मोठा समुद्र राघू) गोंदिया जिल्ह्यात दर्शन होणे ही बाब गोंदिया जिल्ह्यतील जैवविविधतेला पोषक आहे. 20 वर्षापूर्वी त्याच तलावात दोन ग्रेटर फ्लेमिंगो दिसल्याची नोंद आहे. स्थलांतर करताना एक-दोन दिवसासाठी मुक्काम करतात अन्न आणि आराम करण्यासाठी ते सौंदडच्या तलावात थांबले असावेत, त्यानंतर साधारणतः हे पक्षी पाकिस्तानचा सिंध प्रांत, नेपाळच्या तराई भाग, बांगलादेश, श्रीलंका येथे स्थलांतर करतात. पुढे सप्टेंबर ते ऑक्टोबर व मार्च ते एप्रिल या काळात गुजरातच्या कच्छ भागात अंडी घालतात, अशी माहिती गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी दिली आहे.