गोंदिया- सरकारकडे धान साठवून ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे 2 लाख 25 हजार क्विंटल धान तीन जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर उघड्यावर पडूूूून आहे.
आदिवासी विकास महामंडळांतंर्गत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही.
यासाठी सरकार करते खरेदी
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी सरकारकडून सरकारी धान खरेदी केंद्रातून धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी आदिवासी विकास महामंडळातंर्गत या तिन्ही जिल्ह्यात 50 धान खरेदी केंद्र सुरू केले जातात. खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांना कमी दराने धान खासगी व्यापाऱ्यांना विक्री करण्याची वेळ येत नाही.
यंदा रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळाने ४ जूनपर्यंत एकूण २ लाख २५ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र, खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी महामंडळाकडे अद्यापही गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे सर्व लाखो क्विंटल धान तसेच उघड्यावर ताडपत्र्यांत झाकून ठेवले आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसामुळे केंद्रावरील धान भिजले.यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी उघड्यावरील धान खराब होवून सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.