गोंदिया - मंगळवारी पहाटे नागालँडमध्ये नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या परसोडी या गावातील जवान प्रमोद कापगते यांना गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मूळगावी आणण्यात येणार आहे. मात्र प्रमोद यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे मात्र त्यांच्या कुटूंबियांना अजूनही स्पष्टपणे माहीत नसल्याने कुटंबीयांनी केंद्र सरकार आणि सैन्य दलावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रमोद कापगते हे २००१ मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते. त्यांनी नुकतेच आपल्या सेवेचा पहिला टप्पा गाठत देश सेवेची २० वर्षे १० एप्रिलला पूर्ण केली. प्रमोद हे स्वेच्छा निवृत्ती घेऊन या महिन्यातच मूळगावी परत येणार होते. यांची माहिती त्यांनी आपल्या पत्नी आणि कुटूंबियांना फोनद्वारे दिली होती. तशी कागदपत्रे देखील त्यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडे दिली होती. मात्र सेवानिवृत्ती घेतल्यावरही ते कर्तव्यावर कसे रुजू होते, आणि त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे कुटूंबियांना स्पष्ट कळालेले नाही. शहीद प्रमोद कापगते यांच्या मागे दोन मुले पत्नी, आई, वडील आणि भाऊ असा आप्त परिवार आहे.
मंगळवारी सकाळी सैन्य दलाच्या एका अधिकऱ्याने फोन करत प्रमोद हे शहीद झाल्याची माहिती दिल्यानंतर कापगते कुटूंबीय सुन्न झाले. देशाच्या सेवेकरिता मुलाला पाठविले. मात्र त्याचा मृत्यू कशाने झाला आहे, हे देखील कळू न शकल्याने कुटूंबियांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. तर या संदर्भात गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली असता त्यांना देखील शहीद प्रमोद कपगते याचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती नसल्याचे समजले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत व शहीद कुटूंबीयांची भेट घेणार आहेत.