गोंदिया : प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा' मध्ये नायक ज्याप्रकारे चंदनाच्या लाकडांची तस्करी करतो, तशाच प्रकारची तस्करी गोंदिया शहरात पाहावयास मिळते आहे. गोंदिया शहरात 'पुष्पा गॅंग' सक्रिय झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही गोंदिया शहरात राहत असाल आणि तुमच्या घरी चंदनाचे झाड असेल, तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे.
पांढऱ्या चंदनाच्या झाडांची चोरी : चंदनाच्या झाडांच्या चोरीची एक घटना गोंदिया शहरातील गणेशनगर पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरात घडली आहे. तर दुसरी घटना रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत पूनाटोली परिसरात घडली आहे. काही दिवसांपासून चार ते पाच अनोळखी इसम गोंदिया शहरात पांढऱ्या चंदनाच्या झाडांची चोरी करत आहेत. ते झाडांची कत्तल करत झाडाचे मधले खोड चोरून नेत आहेत. आश्चर्याचे म्हणजे, ही झाडं घराच्या कंपाऊंडच्या आत आहेत, मात्र तरीही चोरटे याची बिनधास्त चोरी करत आहेत.
पोलीस अॅक्शन मोडमध्ये : या चंदनाच्या झाडांच्या चोरीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. अशा प्रकारची घटना गोंदिया शहरात प्रथमच घडते आहे. एका घरी झाडाची चोरी करताना हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी गोंदिया पोलीस विभाग सज्ज झाला आहे. गोंदियात अनेकांनी आपल्या घरी पांढऱ्या चंदनाचे झाड लावले आहे. त्यामुळे या गैंगला पकडण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच आपल्या झाडांची सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना देखील वेळ प्रसंगी रात्री जागावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करत चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या गॅंगला पकडावे, अशी मागणी गोंदियातील नागरिकांनी केली आहे.
हे ही वाचा :