गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील तेढा या गावी असलेल्या सरोवरातून पांगोली नदीचा उगम झाला आहे. एकेकाळी गोंदिया, गोरेगाव, आमगाव तालुक्यांतील शेकडो नागरिकांची पांगोलीने तहान भागविली आहे. शेतकऱ्यांसाठी वरदायिनी अशी या नदीची ओळख होती. पण आज तिचे अस्तित्वच कळेना. ती उथळ आणि प्रदूषित झाली आहे. या नदीचे रूप पुन्हा समोर यावे, यासाठी काहींनी प्रयत्न केले. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींपासून थेट मंत्रालय गाठले. मात्र अजून कोणाचेही या नदीकडे लक्ष गेले नाही. लॉकडाऊनच्या काळात देशातील इतर नद्यांचे प्रदूषण कमी झाले असले तरी पांगोली नदी आजही दूषितच राहिली आहे.
गोंदिया, गोरेगाव तालुक्यांतील शेकडो शेतकरी पांगोली नदीच्या पाण्यावर शेती पिकवत असत. यातून शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र, आजघडीला या पांगोली नदीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अस्तित्वाच्या खुणा ती शोधत असून उथळ होत चालली आहे. त्यामुळे पावसाळ्यात साचलेले पाणी वर्षभर साचून राहत नाही. कारण पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा केला जातो. काठांवरील झाडांची अनिर्बंध कटाई होत असल्याने काठ नष्ट होत आहेत. त्यामुळे पात्र आकाराने मोठे होत असून, उथळ होऊ लागले आहे. काठावर माती साचल्याने नदीची खोली कमी होत आहे.
विशेष म्हणजे या नदीच्या उगमापासून आतापर्यंत एकाही ठिकाणी बांध अथवा बंधारे शासकीय यंत्रणेकडून बांधण्यात आलेले नाहीत. पांगोलीच्या पात्रात अंत्यसंस्कार तसेच दरवर्षी मूर्ती विसर्जन केले जाते. परिणामी ती प्रदूषित झाली आहे. गाळ साचण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, प्रशासनाचे गाळ उपशाकडे दुर्लक्ष झाले आहे. काठाशेजारी राइस मिल्स, लाख कारखाने, टाइल्स कारखाने व प्रशासनाने मंजुरी दिलेल्या कारखान्यांतून सतत वाहणारे दूषित पाणी, राइस मिलमधून निघणारी राख यामुळे पाणी दूषित झाले आहे. जलप्रदूषण वाढले आहे. अशा पाण्याच्या वापरामुळे शेती, नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे.
दरम्यान, पांगोली नदीचे पुनरुज्जीवन व्हावे, विकास व्हावा, याकरिता गोंदियातील समाजोन्नती बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी विकास संस्थेने गेली कित्येक वर्षे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधीं पासून थेट मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. निवेदने दिली, स्थानिक खासदार-आमदार यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्री ते पंतप्रधान यांना निवेदन पाठवले. पण निगरगट्ट सरकारला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे येत्या काही वर्षात या नदीचे नाल्यात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - गोंदियात एसआरपीएफच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागून गर्भवती महिला जखमी
हेही वाचा - नियोजनशून्यता : सरकारचे सव्वा दोन लाख क्विंटल धान उघड्यावर