गोंदिया - जिल्ह्यातील पिंडकेपार गावातील जिल्हा परिषद शाळेने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. आतापर्यंत देशाचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार किती लोकांना मिळाला तसेच तो पुरस्कार कधी मिळाला याची माहिती मुलांना व्हावी, या उद्देशाने 'भारतरत्न दर्शन कक्ष' उभारला आहे. या कक्षाचे उद्धाटन गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बळकवळे यांनी केले.
आतापर्यंत ४८ जणांना 'भारतरत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजागोपालचारी हे भारताचे पहिले भारतरत्न. त्यांना १९५४ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१९ मध्ये हा पुरस्कार नानाजी देशमुख यांना देण्यात आला. भारतरत्न पुरस्कार आणि विजेत्यांविषयी सर्व माहिती मुलांना व्हावी, यासाठी पिंडकेपार जिल्हा परिषदेने हा कक्ष उभारला आहे. शाळेतील एका खोलीला भारतरत्न दर्शन कक्ष असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील अशा पद्धतीचा हा पहिला प्रयोग असून जिल्हा परिषदेच्या इतर शाळेत देखील हा उपक्रम सुरू करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बळकवळे यांनी बोलताना दिले.