गोंदिया - विधानसभेचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी धान्य खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी हे केल्याचे स्पष्टीकरण अग्रवाल यांनी दिले आहे.
काय आहे प्रकरण ?
गोंदिया एमआयडीसी येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू झाले आहे. या ठिकाणी अनियमितता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना दिली होती. याची शाहनिशा करण्यासाठी अग्रवाल यांनी १ डिसेंबरला स्वतः धान्य खरेदी केंद्रावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी केंद्रावरील ग्रेडरने आमदारांशी हुज्जत घातली. त्यामुळे आमदारांना राग झाला व त्यांनी ग्रेडरच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडिओ दोन दिवसानंतर सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
मी जनतेची सेवा करण्यासाठी बांधिल -
मला जनतेने निवडून दिले आहे. मी जनतेचा सेवक आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांनी या धान्य खरेदी केंद्रावर ४० किलो ६०० ग्रॅम ऐवजी ४१ किलो धान्य घेत असल्याची माहिती दिली असता, मी स्वतः जाऊन पाहणी केली. ग्रेडरला याबद्दल विचाराना केली तर त्यांनी माझ्याशी वाद घातला. त्यामुळे हे प्रकरण घडल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली. या संदर्भात सेंटरवरील ग्रेडरने अद्याप पोलिसात तक्रार दिलेली नाही.
धान्य खरेदी केंद्रांमध्ये अनियमितता -
गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षी १२ धान्य खरेदी केंद्रावर अनियमितता आढळली. फेडरेशन सेंटरवर नाममात्र कारवाई केली. पुन्हा यातीलच एका सेंटरला धान्य खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. काही ठिकाणांवरही शेतकऱ्यांचे धान्य खरेदी बंद आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न अग्रवाल यांनी उपस्थित केला.