गोंदिया - महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन संबंधात वेळीच उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने १० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांना प्रत्येकी ३० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. याप्रमाणे गोदिंया जिल्ह्यालाही ३० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
अचानक आलेल्या संकटाचा सामना करताना तारांबळ न होता त्याचे योग्य व्यवस्थापन करता यावे, निधीची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला ३० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला वेळीच योग्य व्यवस्थापन करणे शक्य होणार आहेत. राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ ला काढलेल्या आदेशानुसार या निधीचे नियोजन करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त होणाऱ्या निधीतून जनजागृती क्षमता निर्मिती प्रशिक्षण व कार्यशाळा, आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी आवश्यक ती साधनसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी निधी उपलब्ध झाल्याने वेळीच उपाययोजना करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत होणार आहे. शिवाय विभागातर्फे मागील दोन-तीन वर्षापासून योग्य नियोजन केले जात होते, मात्र निधीमुळे अनेकदा समस्या निर्माण झाली होती. नदी लगतच्या गावांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या पुरामुळे अनेकदा शेतकऱ्यांसह नागरिकांनासुद्धा नुकसान सहन करावे लागत होते. पावसाचे पाणी आणि घरातून सोडण्यात येणारे पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने ही समस्या निर्माण होते. त्यामुळे त्याचे योग्य व्यवस्थापन करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचीसुद्धा चांगलीच दमछाक झाली होती. यावर उपाययोजना करण्यासाठी गोंदिया, बालाघाट, शिवनी, राजनांदगाव, भंडारा व गडचिरोली जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जात होती. त्यानंतरही अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. तसेच आता निधी आल्याने उपाययोजना होणार असल्याचे बोलले जात आहे.