गोंदिया - राज्यात कोरोनाने कहर केला असला तरी गोंदिया जिल्ह्यातून सुखावणारी बातमी समोर आली आहे. २३ मार्च रोजी शहरात आढळलेल्या एकमेव कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रूग्णाला रात्री आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
२३ वर्षीय तरूण १७ मार्च रोजी थायलंड वरून परतला होता. त्यानंतर त्याने गोंदिया येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. एका रूग्णामुळे जिल्हा प्रशासनाने अनेकांना होम क्वारंटाईन केले होते, तर संबंधित कोरोना बाधित रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा वासियांसाठी ही सुखद बाब ठरली आहे.