गोंदिया- गोरेगाव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या जंगलातील मांडोबाई देवस्थानात दरवर्षीप्रमाणे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमीचे मुहर्त साधून सामुहिक विवाह सोहळ्यात ४७ जोडपी विवाहबद्ध झाली.
वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबातील लोकांना आपल्या मुला-मुलींचे विवाह सोहळा थाटात माटात करणे परवडत नाही. मांडोबाई देवस्थानच्यावतीने मागील २७ वर्षांपासून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुके, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि झारखंड राज्यातील जोडपी यानिमित्ताने विवाहबंधनात अडकली.
देवस्थानच्यावतीने नवदांपत्यांना ५ भांडी आणि इतर सामग्रीदेखील देण्यात आली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आयोजक विनोद अग्रवालसह मान्यवरांनी विवाह सोहळ्यास हजेरी लावत दांपत्यांना शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्याला १५ हजारांवर वऱ्हाड्यांनी हजेरी लावली होती. 'लाखो भाविकांचे श्रद्धास्थान', अशी ओळख असलेल्या या मांडोबाई देवस्थानात ७०० पेक्षा जास्त जोडपी दरवर्षी विवाह करतात.