गोंदिया - महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याच्या राज्यपालांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल हे पद संविधानिक आहे त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल अपशब्द काढणे निंदनीय असल्याची टीका बडोले यांनी केली आहे.
राज्यपालांबद्दल बोलणे निंदनीय
सांगली जिल्ह्यातील जत येथे एका कार्यक्रमात महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी राज्याच्या राज्यपालपदी बसलेल्या विक्षिप्त माणसामुळे अडचणी येत आहेत. अशी घणाघात टीका ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली होती. या वक्तव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी यशोमती ठाकू यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. तसेच राज्यपाल एक घटनात्मक पद आहे आणि अशा पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तीवद्दल गैरशब्द काढणे निंदनीय असल्याचे बडोले म्हणाले.
वाढीव वीजबिलाविरोधात भाजपचे आंदोलन
वाढीव वीजबिलाविरोधात भाजप सरकारच्यावतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे. गोंदियातसुद्धा भाजपच्यावतीने आघाडीसरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.