गोंदिया - जिल्ह्यातील शेतकरी आपल्या धानाच्या पारंपरिक शेतीवरून आता फळ व फुलांच्या शेतीकडे वळला आहे. मात्र, या शेतकऱ्यांवर कोरोना विषाणूचा संसर्ग आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे संकट ओढावले आहे. त्यामुळे, शेतकरी आपल्याच शेतामधील फुलांना नष्ट करत आहेत.
![शेतामधील फुलांना केले नष्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-16apr20-flowerfarming-7204243_16042020133608_1604f_1587024368_864.jpg)
शेतकऱ्यांच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे मंदीर, मस्जिद, गुरुव्दारा, चर्च ही सगळी धार्मिक स्थळे बंद आहेत. लग्नाचे कार्यक्रमसुध्दा रद्द झाले असल्याने फुलांची मागणी राहिली नाही. त्यामुळे, फुलांना शेतातच नष्ट करून त्याऐवजी दुसरे पिक लावण्यासाठी शेतकरी भाग पडत आहेत. फुलांपासून चांगले उत्पन्न मिळत होते आणि आवकही चांगली होत असे. परंतु, देशव्यापी लॉकडाऊनमुळे फुलांचा व्यापार ठप्प पडला आहे. तसेच बीजोत्पादन, पाणी आणि तोडण्याचा खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
नागपूर, गोंदिया, रायपूर तसेच जवळील इतर बाजारात फुले विकता येत होती. परंतु, सगळे सण व लग्न कार्यक्रम, स्टेज सजावटचे कार्यक्रम रद्द झाल्याने फुलांची मागणी होत नाही. त्यामुळे, फुले पडून खराब होत आहेत. शेतकऱ्यांनी झेंडू, गुलाब, जाफरी, जरबेरा, नरगिंस या फुलांची शेती यावर्षी केली होती. मात्र, या लॉकडाऊनमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे, शासनाने काहीतरी मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.