गोंदिया - आमगाव-गोंदिया मार्गावरील ग्रामठाणाजवळ काल (शुक्रवारी) रात्री ट्रक व रुग्णवाहिकेची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टर चालकासह पाच लोक जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी गोंदियाच्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले असून एका जखमीची प्रकृती गंभीर आहे.
सहयोग नेत्रालय नाव असलेली रुग्णवाहिका आमगावकडून गोंदियाकडे रिकामी जात होती. रात्री साडेआठच्या सुमारास ग्रामठाणाजवळ एका ट्रॅक्टरने या रुग्णवाहिकेला समोरून धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली व जखमींना रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी पोलिसांनी रूग्णालयात येऊन जखमींचा जबाब नोंदवला. या अपघातातील दोषी उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या केवळ अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
या अपघातात जखमी झालेल्या अभिजित कश्ती, विजय रहांगडाले, सुशांत गाडेकर, रोहित आणि मनीष यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहे.