गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील किंडगीपार गावाशेजारी बारब्रिक कंपनीने दगड खोदकाम करण्यासाठी जागा लीजवर घेतली आहे. त्याठिकाणी वाजवीपेक्षा जास्त उत्खनन केले असून याप्रकरणी दीड कोटींचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, कंपनीने दंड भरला नाही. शिवाय या ब्लास्टींगचा शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी तक्रार केली. मात्र, चौकशीअंती तहसिलदारांनी कंपनीच्या बाजूने अहवाल सादर करून गावकरी कंपनीला ब्लॅकमेल करत असल्याचे अहवाला म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले असून स्थानिक आमदार विजय रहांगडाले यांनी तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम जोमात सुरू आहे, तर रस्ता तयार करताना वाळू व दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी बारब्रिक कंपनीने तिरोडा तालुक्यातील किंडगीपार गावाशेजारी लीजवर जागा घेतली आहे. या जागेत प्लांट तयार करत बारूदच्या साहाय्याने दगड तोडण्यात येत आहे. त्यामुळे गावातील काही घरांना तडे गेले आहेत. शेतीवर काम करणाऱ्या लोकांनाही याचा त्रास होतो. याबाबत ग्रामस्थांना वांरवार जिल्हा प्रशासनाकेड तक्रार दिली. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नव्हती. त्यानंतर त्याठिकाणी फक्त ७ ते ९ मीटर खोदकाम करून दगड काढणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात २५ मीटरच्यावर खोदकाम केले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दखल घेत दीड कोटींचा दंड ठोठावला होता. मात्र, कंपनीने दंड भरला नाही. त्यानंतर देखील अवैध खोदकाम केले. त्यामुळे आता या जागेची मोजणी करण्यात येणार असून तेवढा दंड कंपनीवर आकारणार असल्याचे खनिकर्म अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी देखील नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तहसीलदाराच्या समोर या कंपनीने अवैध खोदकाम केले असून तहसिदारने कंपनीला लावलेले दंड आकारण्याऐवजी सादर केलेल्या अहवालात कंपनीची बाजू मांडल्याचा आरोप आमदार विजय रहांगडाले यांनी केला. तसेच शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली.