गोंदिया - कर्ज काढून दोनवेळा बोअरवेल खोदले, मात्र तरीही पाणी न लागल्याने हताश झालेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील किडगीपार येथे घडली. मृत शेतकऱ्याचे नाव अनंतराम लोटनजी हरिणखेडे (वय 55) असे आहे.
हेही वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तैनात
आमगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किडगीपार या गावातील शेतकरी अनंतराव लोटनजी हरिणखेडे यांची 2 एकर भाताची शेती आहे. या शेतीवरच वृद्ध आई, पत्नी व दोन मुले यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या भाताच्या शेतीसाठी पाण्याची सोय नसल्याने 4 वर्षांपूर्वी 400 फूट बोअरवेल खोदून शेतीला पाणीपुरवठा करत होते. मात्र, बोअरवेलद्वारे आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांनी दुसरा बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेतले. त्यानंतर दुसरा 350 फूट बोअरवेल खोदून ही त्याला पाणी न लागल्याने ते हताश झाले. त्यामुळे शेती कशी करायची व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून ते खचून गेले. नैराश्येतून शेतात जाऊन त्यांनी विष घेतले व त्यानंतर घरी येऊन झोपी गेले. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.