गोंदिया - तांदळाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्हा हा राज्यात ओळखला जातो. आमगाव तालुक्यातील भोसा येथील शेतकरी रामेश्वर मेंढे व चिंतामण कारंजेकर यांच्या शेतावर ड्रम सिडर या यंत्राचा वापर करून भात पेरणीचा प्रयोग करण्यात आला. कृषी विभागाच्या सहकार्याने प्रथमच या यंत्राचा वापर करून भात पेरणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी ड्रम सिडरने कमी वेळात धान पिकाची पेरणी करणे शक्य होणार आहे. एका ड्रमच्या साहाय्याने दोन ओळी अशा प्रकारे चार ड्रमच्या साहाय्याने आठ ओळीत २० सेंमी अंतर ठेवून पेरणी करता येते. या यंत्रामुळे कमी वेळात जास्त पेरणी होते व बियाणांची बचत होते.
एक मजूर या यंत्राद्वारे एका दिवसात २ ते ३ एकर धान पेरणी करतो. धान लावणीच्या वेळी मजुरी खर्चात बचत नक्कीच होते. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. यावेळी शेतावर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. हा प्रयोग शेतकऱ्यांनी स्वतः केल्याने शेतकऱ्याला याचा फायदा होणार असल्याचेही शेतकरी बोलत आहेत.