गोंदिया - कलपाथरी येथे शेतात जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने एका शेतकऱ्याने आपल्या आईसोबत शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा या शेतकऱ्याने घेतला आहे.
कलपाथरी येथील शेतकरी ढेकल ढोरे यांच्या शेतात जाणारा रस्ता गावातील हिरामण डोये, सावलराम डोये यांनी पुनर्रमोजणीव्दारे काबीज बंद केला. त्यामुळे ढोरे यांची मुलगी इमला पारधी आणि नातू पुरणलाल पारधी यांनी २५ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. शेतकरी ढेकल ढोरे यांची शेतजमीन मोहाडी राजस्व मंडळ अंतर्गत येते. या वडिलोपार्जित शेतजमिनीत जाणाऱ्या रस्त्यावर दुसरे शेतकरी डोये यांनी पुनर्मोजणी शाखेशी संपर्क साधून प्रचलित रेकार्डवर स्व:ताचे नाव टाकून हा वहिवाट रस्ता बंद केला, असा आरोप पुरणलाल पारधी यांनी केला आहे.
हेही वाचा - आदिवासींसह वंचित घटकांना सीएए आणि एनपीआरचा त्रास होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
रस्ता नसल्याने शेतात जाण्यासाठी पारधी कुटुंबीयांना अडचण होत आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार १८ फेब्रुवारी २०१९ ला उपअधिक्षक भुमीअभिलेख विभाग, गोरेगाव येथे केली होती. मात्र, एक वर्ष होऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्याने मंगळवार स्वतःच्या शेतातच बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.
या आंदोलनाची माहिती प्रशासनाला मिळताच, या समस्येचे निराकरण करण्यासाठी आंदोलनस्थळी नायब तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी, मंडळ अधिकारी आणि राजस्व विभागाचे कर्मचारी उपोषण मंडपात पोहोचले. उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, जोपर्यंत मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा पुरणलाल पारधी यांनी आहे.