गोंदिया - गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने नक्षलग्रस्त असलेल्या पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत येत असलेल्या गडमाता पहाडी-बेवारटोला परिसरातील डॅम जंगलात नक्षल्यांनी पोलिसांना मारण्याच्या हेतूने पेरून ठेवलेल्या स्फोटक साहित्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. सी 60 जवानांचे पथक गोंदिया आणि सी 60 पथक सालेकसा, बी.डी.डी.सी पथक आणि श्वान पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गडमाता पहाडी-बेवारटोला डॅम दरेकसा जंगल परिसरात शोध मोहीम सुरु केली होती.
पोलिसांना रविवारी (7 नोव्हेंबर) गोंदिया नक्षल सेलला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात सी 60 पथक गोंदिया व सालेकसा, तसेच बॉम्ब नाशक पथक व श्वान पथकाच्या मदतीने सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत गडमाता परिसरात शोध घेण्यात आला. तेथे पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी गाडून ठेवलेले स्फोटके, नक्षल साहित्य व काही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
यात 80 फुट वायर, 8 जिलेटीन कांड्या, नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर, 2 गावठी बंदूक, राऊंड-2, मेडिसीन बॉक्स, जुने पिस्टलसारखे दिसणारे 2 शस्त्र, नक्षल गणवेश, इलेक्ट्रिक डिटोनेटर 11, प्रिंटेड सर्किट बोर्ड 2, हिरव्या रंगाचे ओलसर स्फोटक पाऊडर 700 ग्राम, जुने देशी कट्टे 2, राखाडी रंगाचे स्फोटक सदृश्य पाऊडर 700 ग्राम या साहित्यांचा समावेश आहे.
हे साहित्य जप्त करून सालेकसा पोलीस ठाण्यात नक्षल्यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम 307, 120 सहकलम 13, 18, 20, 23, भारतीय स्फोटक पदार्थ कायदा 4-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल करीत आहेत.