गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या ठाणा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे पोषण आहार वाटपात अनियमितता आढळून आल्याची घटना उजेडात आली व या पोषण आहारात देत असलेल्या सामग्रीची मुदत (एक्सपायरी) दिनांक संपलेले मिरचे पावडरचे पॅकेट विद्यार्थ्यांना देण्यात आले व काही मुदत संपलेले मिरची पावडरचे पॅकेट कचरा कुंडीत आढळले. तसेच पोषण आहारामध्ये शाळेतील वाटप रजिस्टरवर पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या फक्त सह्या घेऊन वाटप करण्यात आले. मात्र रजिस्टरवर पोषण आहार कोणाला किती दिले याचा उल्लेखच नाही.
ठाणा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहारात अनियमितता आढळून आले असून त्यामध्ये देण्यात येणारे मिरची पावडरचे पॅकेट मुदत (एक्सपायरी) दिनांक संपलेले विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. असा आरोप पालकांनी व नागरिकांनी संबंधित शिक्षकावर लावलेला आहे. पोषण आहार वाटप असताना शाळा समितीचे अध्यक्ष संतोष वंजारी हे पोहोचले असता त्यांच्या निदर्शनात आले, की मिरची पावडर पॅकेट हे एक्सपायरी डेट झाले आहे तेव्हा हे मिरचीचे पावडर पॅकेट वाटप करणे बंद केले व या प्रकरणाची माहिती येथील सरपंच व पोलीस पाटील यांना देण्यात आली तेव्हा सरपंच यांनी शिक्षण विभागाचे संबंधित गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे व गट शिक्षणाधिकारी वाय सी भोयर यांना या प्रकरणाविषयी माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, संबंधित अधिकारी घटनास्थळावर पोहोचले व चौकशी केली तेव्हा मुलांना दिलेल्या मिरची पावडरचे पॅकेटची तयार करण्याची दिनांक जुलै 2018 ची आहे. त्याची मुदत फक्त आठ महिन्याची असते पण मिरची पावडरची मुदत संपूनही ते पॅकेट देण्यात आले व मिरचीचे १७ पॅकेट कचरा पेटीत आढळले. संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेमध्ये असलेल्या पोषण आहार व मिरची पावडर यांचा स्टॉक मोजून किचन रूमवर स्टोअर रूमला सीलबंद केले. याप्रकरणाची सखोल चौकशी करून तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करणाऱ्या मुख्याध्यापक व संबंधित पोषण आहारच्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी येथील पालकांनी केली आहे.