गोंदिया - जिल्हा परिषदेत ड्रेसकोडवरून वरिष्ठांनी खडेबोल सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका कर्मचाऱ्याने चक्क धोतर, कुर्ता, टोपी घालून येत सर्वांना आश्चर्यचकित केले. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील या कर्मचाऱ्याने धोतर, कुर्ता, टोपी असा नेत्यासारखा पेहराव केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.
राज्यासह गोंदिया जिल्हा परिषदेतही 'फॉर्मल ड्रेसकोड' परिधान करून कार्यालयात येण्याचे निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ प्रदीपकुमार डांगे यांनीही सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत फॉर्मल कपडे परिधान करून येण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यानंतरही काही कर्मचारी सीईओच्या निर्देशाला फाटा देत जीन्स, टी शर्ट घालून येताहेत. काल डेप्युटी सीईओ भांडारकर यांनी सामान्य प्रशासन विभागातील भूपेंद्र रणदिवे या कर्मचाऱ्याला फॉर्मल कपड्यांबाबत सुनावले. ड्रेसकोडवरून वरिष्ठांकडून बोलणी खावी लागण्यानंतर रणदिवे यांनी चक्क धोतर, कुर्ता, टोपी असा नेत्यासारखा पेहराव करत गांधीगिरी केली.
हेही वाचा - गृहमंत्र्याच्या स्वागताचे फलक काढले; बाजार अधीक्षकासह तिघे पोलिसांच्या ताब्यात
कार्यालयीन कामकाजाचा दिवस.. वेळ सकाळी १० वाजताची.. जिल्हा परिषदेतील सर्वांनाच आपआपल्या कार्यालयात जाण्याची लगबग. त्याच दरम्यान एक रुबाबदार व्यक्ती धोतर, कुर्ता आणि डोक्यावर नेहरू टोपी घालून जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या कार्यालयात जाण्यासाठी रुबाबदार शैलीत प्रवेश करतो. सर्वच अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्याला पाहून नवल वाटत होते की, कोणी नेता तर व्हिजिट द्यायला तर आला नाही ना.. हा विचार करून नंतर सर्वच कर्मचारी आपल्या कामात व्यग्र झाले. नंतर सर्वाच्या लक्षात आले की, तो दुसरा-तिसरा कोणी नसून जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचा कर्मचारी भूपेंद्र रणदिवे आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि जिल्हा परिषदेत कामासाठी आलेल्या नागरिकांनाही आज आश्चर्याच धक्का बसला.
या प्रकारानंतर फॉर्मल कपड्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या रणदिवे यांना वरिष्ठांकडून पुन्हा सुनावले गेले. डेप्युटी सीईओंनी निलंबानाची कारवाई करण्याचा इशारा देत त्यांना साध्या कपड्यांत येण्याचे फर्मान दिले. अखेर धोतर, कुर्ता, टोपी काढून साध्या पेहरावात कार्यालयात येण्याची पाळी रणदिवे यांच्यावर आली. मात्र, या कर्मचाऱ्याच्या पेहरावाची दिवसभर चर्चा सुरू राहिली.
हेही वाचा - निवडणुकीत पराभव होऊनही 'त्याने' जिंकली मतदारांची मने; बॅनर लावून मानले आभार