गोंदिया- जून महिन्यातील मृग नक्षत्रात अपेक्षेप्रमाणे पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीचे कामे करता आली नाहीत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावताच मोठ्या प्रमाणात पेरण्या करून भातपीक रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र सद्य:स्थितीत पावसाने दडी मारल्याने शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. परिणामी भाताची रोपे पाण्याअभावी सुकत आहेत.
जिल्ह्यात यंदा खरीपात १ लाख ९२ हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी भातपीक लागवड केली होती. ते सर्व वाया गेल्याने शासनाने शेतकऱ्यांना सवलतीवर भातपीक वाण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीचे कामे आटोपली. जवळपास ९५ टक्के पेरणी या काळात झाली होती. पेरणी केल्यानंतर एका दमदार पावसाची गरज असते. मात्र, मागील ८ ते १० दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या संकटात आल्या आहेत. पंधरा दिवस पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उष्णेतेत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेली रोपे उष्णतेमुळे जळाली आहेत. तसेच शेतात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
हवामान विभागाने जुलै ते ऑगस्ट महिन्या दरम्यान १५ दिवसांचा पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.