गोंदिया - कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मात्र, आता शाळा सुरू झाल्या आहेत. सध्या दहावीच्या परीक्षा (SSC Exam) सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी (Morgaon Arjuni School) येथील बहुउद्देशीय शाळेत दहावीची परीक्षा सुरू असताना कॉपीचा प्रकार समोर आला आहे. गणिताचा पेपर सुरु असताना शाळेतील शिक्षक व कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करत असल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. हा व्हिडिओ एका पालकाने काढला असून, तो सध्या व्हायरल होत आहे.
गोंदिया शिक्षण विभागाकडे तक्रार - विशेष म्हणजे कॉपी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. परीक्षा खोलीच्या बाजूला रिकाम्या खोलीत सर्व कॉपीचे साहित्य ठेवले होते. आवश्यकतेनुसार एक-एक विद्यार्थी कोणाला दिसू नये अशाप्रकारे खाली वाकून खोलीत जाऊन कॉपी घेत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. तसेच कॉपीच्या सुरक्षेसाठी तिथे एक कर्मचारीच नियुक्त केला आहे. गोंदिया शिक्षण विभागाला याची तक्रार करुन कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप पीड़ित पालकाने केला आहे.
शिक्षण विभागाच्या पथकाने दिली शाळेला भेट - याबाबत शिक्षणाधिकारी केदार शेख यांना विचारणा केली. ते म्हणाले की, याबद्दल आमच्या कार्यालयात व माझ्याकडे सध्या कोणतीही तक्रार आलेली नाही. त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी आणि उपशिक्षण अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. त्यांनी सांगितले की या प्रकरणाबद्दल त्यांच्याकडेही अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच आज तक्रार दाखल झाली असता, शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्या पथकासह मोरगांव अर्जुनी येथील बहुउद्देशीय शाळेत भेट दिली. तसेच आज विद्यार्थी पेपर देत असताना पूर्ण वेळ हे पथक तिथे थांबत चौकशी केली. त्याचप्रमाणे त्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून लेखी पत्र घेतले असल्याचे शेख यांनी सांगितले.